Saturday, March 31, 2018

हनुमान जयंती निमित्त हनुमंतांच्या व्यक्तिमत्वाचं एक चिंतन मराठी लेख




हनुमान जयंती निमित्त हनुमंतांच्या व्यक्तिमत्वाचं एक चिंतन


अश्वत्थामा बलिर्व्यासौ हनुमानश्च विभीषण: !
कृप: परशुरामश्च सप्तैते चिरजीविन: !!


आज हनुमान जयंती. सप्तचिरंजीवांपैकी एक म्हणजे वीर हनुमंत ! नुकतीच रामनवमी साजरी झाली. खरंतर महाबली नि अतुलपराक्रमी नि आजीवन अखंड ब्रम्हचारी अशा श्रीरामचंद्रभक्त अंजनेय हनुमंताचं चरित्र आम्हांस ज्ञात आहेच पण तरीही त्या नरश्रेष्ठाचं व्यक्तिमत्व नक्की कसं होतं ह्याविषयी रामायणात फार विलोभनीय नि विलक्षण चिंतनीय असं वर्णन आलं आहे. आजकाल व्यक्तिमत्व विकास(Personality Development) हा एक परवलीचा शब्द झाला आहे. अगदी शाळकरी मुलांमध्येदेखील ह्याची प्रचंड आवड किंवा आंग्लभाषेतल्या शब्दाप्रमाणे "क्रेझ"आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. ह्या व्यक्तिमत्व विकासासाठी सहस्त्रो रुपयांचे वर्ग लावण्यापेक्षा हनुमंताचं चरित्र वाचलं तरी ही आपल्याला बरंच काही शिकायला मिळेल नि व्यक्तिमत्व कसं असावं ह्याचं उत्तम उदाहरण हनुमंताच्या नि रामचंद्राच्या चिंतनातून नि कार्यातून आपल्याला पहायला मिळेलं. त्यासाठी हा लेखनप्रपंच !

रामायणातले किष्किंधा कांड सांगते की मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीरामचंद्र हे सीतेच्या हरणानंतर कबंधाच्या सुचनेनुसार सुग्रीवाचा शोध घेत असताना ऋष्यमुख पर्वतावर आले. तेंव्हा वालीच्या भयाने राज्यापासून दूर असेला सुग्रीव हा ह्या दोन नरश्रेष्ठांना पाहून किंचित आश्चर्यचकित नि शंकामग्न होउन थोड्या भयानेच का होईना पण आपल्या हनुमंत नावाच्या मंत्र्यांस ह्या दोन राजकुमारांची पारख करण्यास पाठवतो. तेंव्हा हनुमंत हे एका ब्राम्हणाचं रुप घेउन राम-लक्ष्मणांना भेटावयांस येतात नि त्यांस आत्मपरिचय देउन त्यांचा परिचय वगैरे विचारतात. हनुमंतांचं रामाबरोबरचे ते संभाषण जरी वाचलं तरी हनुमंतांच्या बुद्धिमत्तेचं दर्शन तर घडतंच पण त्यापेक्षाही एक दुत म्हणून कसं बोलावं ह्याचा एक आदर्शही प्रकट होतो. हनुमंताचं ते सुमधुर बोलणं ऐकल्यावर श्रीरामचंद्र लक्ष्मणांस हनुमंताचं जे वर्णन करतात ते खालीलप्रमाणे आहे. आणि हेच आजच्या आपला चिंतनाचा विषय आहे. श्रीरामचंद्र प्रभु म्हणतात की


नानृग्वेदविनीतस्य नायजुर्वेदधारिणम् |
नासामवेदविदुष: शक्यमेवं विभाषितुम् || २८ ||

अर्थ - ज्याला ऋग्वेदाचं शिक्षण मिळालेलं नाही, ज्यानं यजुर्वेदाचा अभ्यास केला नाही, जो सामवेदाचा विद्वान नाही, तो याप्रकारे सुंदर भाषेत वार्तालाप करु शकणार नाही.

नूनं व्याकरणं कृत्स्नमनेन बहुधा श्रुतम् |
बहु व्याहरतानेन न किंचिदपशाब्दितम् ||२९ ||

अर्थ - निश्तितपणानं ह्या हनुमंताने सर्व व्याकरणाचा अनेक वेळा बारकाईनं अभ्यास केला आहे. कारण इतका वेळ बोलत असुनही त्याच्या तोंडातून एकही अशुद्ध बोल बाहेर पडला नाही.


न मुखे नेत्रयोश्चापि ललाटे च भ्रूवोस्तथा |
अन्येष्वपि च सर्वेषु दोष: संविदित: क्वचित् ||३०||

अर्थ - संभाषणाच्या वेळी ह्याचे मुख, डोळे, कपाळ, भूवई तसेच अन्य सर्व अंगामधूनही एखादा दोष प्रकट झालेला आहे असं मला दिसला नाही !


अविस्तरमसंदिग्धमविलम्बितमव्ययम् |
उर:स्थं कण्ठगं वाक्यं वर्तते मध्यमस्वरम् ||३१||

अर्थ - यानं थोडक्यात पण अगदी स्पष्टपणं आपलं म्हणणं मांडलेलं आहे. ते समजण्यास नि:संदिग्ध होतं. थांबुन थांबुन किंवा शब्द आणि अक्षरे तोडून कुठलंही वाक्य त्यानं उच्चारलं नाही. कुठलंही वाक्य कर्णकटु वाटलं नाही. त्याची वाणी ह्रदयात मध्यमारुपाने स्थिर झाली आहे आणि कंठातून वैखरी रुपाने प्रकट झाली आहे !


संस्कारक्रमसम्पन्नामद्भुतामविलम्बिताम् !
उच्चारयति कल्याणी वाचं ह्रदयहर्षिणीम् ||३२||

अर्थ - बोलताना याचा आवाज फार बारीकही येत नाही नि फार वरही जात नाही. मध्यम आवाजात त्यानं सर्व काही सांगितलं आहे !


अनया चित्रया वाचा त्रिस्थानव्यंजनस्थया |
कस्य नाराध्यते चित्तमुद्यतासेररेरपि ||३३||

अर्थ - ह्रदय, कंठ आणि मुर्धा ह्या तीन स्थानांकडून स्पष्ट रुपानं अभिव्यक्त होणारी ह्याची ही चित्रवतवाणी ऐकुन कुणाचं चित्त प्रसन्न होणार नाही? वध करण्यासाठी म्हणून तलवार उचललेल्या शत्रुचं ह्रदय देखील ह्या वाणीनं बदलु शकेल !


एवंविधो यस्य दुतो न भवेत् पार्थिवस्य तु |
सिद्ध्यन्ति हि कथं तस्य कार्याणां गतयोsनघ ||३४||

अर्थ - हे निष्पाप लक्ष्मणा, ज्या राजांपाशी ह्यासारखे दुत नसतील, त्यांची कार्य सिद्धी कशी होउ शकेल बरे???

किष्किंधा कांड - वाल्मीकि रामायण - सर्ग तीन -  श्लोक संख्या २८ ते ३४


प्रत्यक्ष श्रीरामचंद्राच्या तोंडुन पहिल्याच भेटीत हनुमंताबद्दलचं हे चिंतन ऐकल्यावर हनुमंताचं व्यक्तिमत्व किती विलक्षण प्रभावशाली असेल ह्याची आपण केवळ कल्पनाच करु शकतो. पहिल्याच भेटीत श्रीरामचंद्र हे बोलतात ! काय आश्चर्य आहे !

बुद्धिमतां वरिष्ठं अशा हनुमंतांनी सर्व वेदांचा सुक्ष्म रीतीने अभ्यास केला होता नि त्यांचं आचरण पण तसंच होतं. व्याकरणाचा पण त्यांचा अभ्यास आहे. म्हणजे वानर देखील त्यावेळी वेदांचा अभ्यास करत होते. मग तथाकथित स्त्री-क्षुद्रांना नि तथाकथित बहुजन समाजाला वेद नाकारण्याचा प्रश्न येतोच कुठे??? किती दिवस आम्ही हा खोटी धारणा बाळगणार आहोत की हिंदु धर्मात वेदांचा अभ्यास फक्त विशिष्ट जातींपुरता होता नि आहे म्हणून???मधील काळात तो नाकारला गेला असेल तर ते पापच आहे नि निंदनीयच आहे.

रामचंद्रांचा देखील वेदांचा नि संस्कृत व्याकरणाचा अभ्यास होता नि ते देखील त्यात पारंगत असुन रत्नपारखी होते हे किती विलक्षण आहे. असो ! पुढे श्रीरामचंद्र म्हणतात की हनुमंत हे बोलताना कुठेही तुटकतुटक किंवा असंबद्ध किंवा अशुद्ध बोलत नाहीत. चेहरा किंवा अंगप्रत्यंगावरचे हावभाव किंवा हालचाल देखील किती आदर्श नि आचरणीय आहे. हनुमंताची वाणी ह्रदयात मध्यमारुपाने नि कंठात वैखरी रुपाने स्थिर आहे कारण योगशास्त्रानुसार वाणीचे जे प्रकार आहेत, त्यामध्ये मध्यमा, वैखरी, परा नि पश्यंती असे प्रकार आहेत. त्यातही हनुमंत हे पारंगत आहेत हे सिद्ध होतं. कारण त्यांचा आवाजही फार वर किंवा खाली नसुन मध्यम होता. त्यामुळे श्रीरामचंद्र म्हणतात की ह्याची वाणी ऐकुन एखादा शस्त्रधारी देखील आपलं शस्त्र खाली ठेवेल. इतकी विलक्षण सुंदर नि कर्णमधुर वाणी हनुमंतांची आहे. असा मंत्री ज्याच्या जवळ असेल त्याची कार्यसिद्धी झाल्याशिवाय राहील का???

व्यक्तिमत्वाचं ह्यापेक्षा उत्तम उदाहरण शोधायची आवश्यकता आहे का ??? वेदांचा नि संस्कृत व्याकरणाचा अभ्यास जर वानर देखील करत असतील तर आम्हा मनुष्यांना तो आज का एवढा अस्पृश्य झालाय??? किती करंटे आहोत आम्ही भारतीय??? दुर्दैवी ते आणखी कोण???


रामायणात इतर ठिकाणचे वर्णन

मुळ वाल्मीकि रामायणात हनुमंताचे जे वर्णन आले आहे, ते वाचले की मन अक्षरश: थक्क होते. ते , बुद्धिमतां वरिष्ठं तर आहेतच पण त्याहीपेक्षा सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांचा प्रखर इंद्रियसंयम म्हणजे कडकडीत असं आजीवन अखंड ब्रम्हचर्य ! ब्रम्हचर्याचं सामर्थ्य हे हनुमंताशिवाय अन्यत्र कुठेच फारसं प्रकट झालेलं नाही. महाभारतातल्या भीष्माचार्यांचं उदाहरण तसं जरी असलं तरीही हनुमंतांचं उदाहरण हे विलक्षण प्रेरणादायी आहे. समर्थ देखील म्हणतात की


मुखी राम त्या काम बाधु शकेना |
गुणे इष्ट धारिष्ट्य त्या हे चुकेना |
महाभक्त शक्त कामास मारी |
जगीं धन्य तो मारुती ब्रम्हचारी |

महर्षी वाल्मीकि स्पष्ट म्हणतात की

न भुमौ नान्तरिक्षे वा ना नाम्बरे नामरालये |
नाप्सु वा गतिसंगं ते पश्यामि हरीपुंगव: |

मारुतीसारखा कुणी जलचरात नाही, भूमीवर नाही, अंतरिक्षात नाही, अंबरात नाही, स्वर्गातही नाही !


जगद्गुरु तुकोबाराय तर स्पष्टच म्हणतात

बाप माझा ब्रम्हचारी | मातेसमान अवघ्या नारी |

सुग्रीव सीताशोधाच्यावेळी हनुमंतांना उद्देशुन म्हणतो की

"हे हनुमंता, तुला असुर, गंधर्व, नाग, मनुष्य, राजे लोकांचं ज्ञान आहे. लोकपालांसह चौदा भुवने, एकवीस स्वर्गांचे तुला ज्ञान आहे. सागरांसह पर्वताचं तुला ज्ञान आहे. हे मारुती तुझी अकुंठीत गती, तुझा वेग, तेज व स्फुर्ती हे सर्व सद्गुण तुझ्यात परिपुर्ण आहेत. या भुमंडलात तुझ्या सारखा तेजस्वी दुसरा कुणीही नाही."

हनुमंत हे आजीवन अखंड ब्रम्हचारीच !

कुठल्या तरी थोतांड पुराणामध्ये की पराशर नामक कुठल्या तरी संहितेमध्ये की स्मृतीमध्ये म्हणे हनुमंताचा सूर्यकन्येशी विवाह आहे म्हणे. काहीही कथा वाट्टेल त्या रचायच्या नि निंदा करायची आपल्या राष्ट्रपुरुषांची. जरा तरी लज्जा वाटायला हवी एका नैष्ठिक ब्रह्मचार्यावर हा आरोप करताना.

ब्रम्हचर्याचे दोन प्रकार आहेत. एक नैष्ठिक (उपकुर्वाण) ब्रम्हचर्य नि दुसरे गार्हस्थ्य ब्रम्हचर्य ! विवाह करुन देखील केवळ स्वस्त्रीशी तेदेखील शास्त्रात सांगितल्याप्रमाणे संसार करणे देखील गार्हस्थ्य ब्रम्हचर्याचे उदाहरण आहे. आजीवन अखंड ब्रम्हचारी भीष्माचार्यांनी महाभारतात धर्मराज युधिष्ठिराला उपदेश करताना गार्हस्थ्य ब्रम्हचर्याची व्याख्या सांगितली आहे. असो ! याज्ञवल्क्यस्मृतीमध्ये ब्रम्हचर्याची व्याख्या अशी केली आहे की

कर्मणा मनसा वाचा सर्वावस्थासु सर्वदा |
सर्वत्र मैथुनत्यागौ ब्रम्हचर्यं प्रचक्षते |

अंत्यबिंदु निषेकस्तु मैथुनम् |

अथर्वेवेद पण स्पष्ट सांगतो की

ब्रम्हचर्येण तपसा देवा मृत्युमुपाघ्नत |
इन्द्रौ हि ब्रम्हचर्येण देवेभ्य: स्वराभरत |
(अथर्ववेद)

अर्थ - ब्रम्हचर्याच्या जोरावरच देवतांनी मृत्युवर विजय मिळवला. इंद्राने देखील ब्रम्हचर्यानेच देवांचं राजपद मिळवलं.

भगवान शंकर देखील म्हणतात

सिद्धे बिन्दौ महादेवि किं न सिद्ध्यति भूतले |
यस्य प्रसादान्महिमा ममाप्येतादृशौ भवेत् |

न तपस्तप इत्याहुर्ब्रम्हचर्यं तपोत्तमम् |
उर्ध्वरेता भवेद्यस्तु स देवो न तु मानुष: |

ब्रम्हचर्यांचा महिमा यापेक्षा आणखी गायची आवश्यकता आहे काय? हनुमंत हे तर ब्रम्हचर्याचे मुर्तिमंत उदाहरण आहे. कारण रामायणात स्पष्ट उल्लेख आहे की हनुमंत हे आजीवन अखंड ब्रह्मचारीच होते. ज्ञानोबाराय म्हणतात

कर्मे हनुमंत उदरी कांसोटा | कर्मे शुकदेव गर्भिकष्टा |


हनुमंताचा कुठलाही मुलगा वगैरे नाहीये.

लंपट लोकांनी रामायणाच्या नावाखाली काहीही वाट्टेल कथा जोडलेल्या आहेत. म्हणे मकरध्वज मगरीला जन्मला. लाज कशी वाटत नाही रे निर्लज्जांनो?

हिंदुंना परधर्मीय शत्रुंची आवश्यकताच काय? हे असे पौराणिक प्रवृत्तीचे आहेत ना. असो.

तर अशा ह्या नरश्रेष्ठांस कोटी कोटी प्रणाम !!!


महाबली, अतुपराक्रमी, चतुर्वेदांचे जाणकार पवनसुत अंजनेय श्रीरामदुत हनुमान की जय ! सियांवर श्रीरामचंद्र की जय !! हिंदुधर्मकी जय !!! हिंदुराष्ट्रकी जय !!!


भवदीय,

तुकाराम चिंचणीकर

No comments:

Post a Comment